चौदा वर्षे जपलेले हायड्रा (जलव्याल) बॅगेत भरलेल्या कुपीमध्ये सुरक्षित होते. त्यांचे अन्न, त्यांना राहण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट पाण्याच्या बाटल्या, काचेची भांडी असे सगळे भरून झाले. पण बॅग भरताना रोहिणीच्या छातीत धडधडत होते; प्रयोगशाळेतले सामान घरी घेऊन जाण्याची वेळ नेहमी थोडीच येते? कोविड-१९ महामारीचा धोका पुढे उभा ठाकला होता, आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला होता. त्यांनी तेव्हा काही केले नसते, तर कुपीमधले ते शुंडकधारी प्राणी खचितच मेले असते. सुदैवाने हायड्रा घरी सुरक्षितपणे पोचले. रोहिणीच्या ह्या धाडसी कृत्याबद्दल संपूर्ण देशातील जीवविकासशास्त्रज्ञ त्यांचे ऋणी असतील. रोहिणी लोंढे आघारकर संशोधन संस्था (एआरआय) येथे टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. येथील हायड्रा जोपासणे आणि वाढवणे ही त्यांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. हायड्रा हे गोड्या पाण्यातले अगदी साधे प्राणी असतात. त्यांचा आकार काही मिलीमीटर असतो व त्यांच्या पुनरुज्जीवन ह्या गुणधर्मासाठी ते ओळखले जातात. हे प्राणी म्हणजे जेलीफिश चे चुलत भावंडं म्हणते येईल. पुनरुज्जीवन होत असल्याने हे निरंतर जीवंत राहतात. प्राण्यांतील पेशींचे पुनरुज्जीवन, विकास आणि वाढ यांचा अभ्यास करणारे संशोधक प्रयोगांसाठी नमुना म्हणून हायड्रांचा उपयोग करतात. हायड्राची काळजी घ्यायला कुणी जाऊ न शकल्याने लॉकडाऊन मध्ये हायड्रा मेले असते तर संशोधनासाठी योग्य हायड्रा पुन्हा मिळवण्यासाठी निदान एक वर्ष तरी थांबावे लागले असते. लॉकडाऊन मुळे प्रवास व वाहतूकीवर निर्बंध असल्यामुळे इतर कुठून प्रयोगांसाठी नमुने कधी मिळतील ह्याचा नेम नव्हता. त्यामुळे विभाग-प्रमुख, शास्त्रज्ञ सुरेंद्र घासकडबी ह्यांच्या पाठिंब्याने रोहिणीताईंनी हायड्रा घरी घेऊन जायचे ठरवले. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे संशोधकांना लॉकडाउन शिथिल झाल्या झाल्या संशोधन सुरू करणे शक्य झाले.
रोहिणीताईंचा जन्म पुण्याजवळील इंदापूरला मोठ्या एकत्रित शेतकरी कुटुंबात झाला. शाळेत असताना विज्ञान शाखेत शिकण्याचा विचार नव्हता. त्यांच्या कुटंबातील भावंडांची शेती व शेतीविषयक कामांना उपयोग होईल अश्या विचाराने वाणिज्य शाखेला पसंती होती. रोहिणीताई सांगतात, “मी १४ वर्षांची असताना घडलेल्या घटनेमुळे माझे आयुष्य बदलले. माझ्या वडिलांना एक अपघात झाला व त्यांना बरे करण्यासाठी अनेक ऑपरेशन करावी लागली. जवळजवळ वर्षभर ते रुग्णालयात होते. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ह्या कठीण काळात आम्ही दोघांनी ठरवले, की मी डॉक्टर व्हायचे.” पुढे त्यांना मेडिकल कॉलेजला जाणे शक्य नाही झाले, मात्र त्यांनी झूलॉजी घेऊन बीएससी केले.
सन २००२ मध्ये जीवविकास विज्ञान ह्या विषयात एमएससी करण्यासाठी रोहिणीताई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसततिगृहात दाखल झाल्या. लहान शहरातून आल्यामुळे त्यांना मोठ्या शहरातल्या जीवनशैलीशी जुळवून घेणे सोपे नव्हते. घरची आठवण तर येतच होती, त्यात सुरुवातीच्या काळात अन्नातून विषबाधा झाली. पण त्याहून मोठे आव्हान होते इंग्रजी भाषेचे. रोहिणीताई व त्यांच्यासारख्याच लहान शहरांतून आलेल्या काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरचे प्रभुत्व पुरेसे नव्हते. शिकवलेले समजायला वेळ लागत असे. “पण माझ्या शिक्षिका सरोज घासकडबी आणि विद्यापीठातील इतर शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केली. आम्हाला शिकवलेले नीट समजावे म्हणून वर्ग संपल्यावरसुद्धा ते आम्हाला वेळ द्यायचे,” असे रोहिणीताई म्हणतात.
पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर रोहिणीताईंनी पुणे विद्यापीठात जुनियर रीसर्च फेलो म्हणून काम केले. सन २००५ मध्ये त्यांना आघारकर संशोधन संस्थेत विज्ञान सहायक (सायंटिफिक असिस्टंट) म्हणून नोकरी चालून आली. त्यांनी लगेचच ती नोकरी स्वीकारली कारण आर्थिक स्थैर्याबरोबरच चांगले काम करण्याची संधी त्यांना मिळणार होती.

चित्र शीर्षक : एआरआय मधील जीवविकास शास्त्र गट. उजवीकडून चौथ्या रोहिणी लोंढे चित्र सौजन्य: रोहिणी लोंढे
सुरुवातीला रोहिणीताईंकडे कोंबडीचे भ्रूण आणि हायड्रा ह्या दोन प्रकारच्या प्राण्यांचे नमुने संभाळण्याची जबाबदारी होती. प्राण्यांमधील विकसन जीवशास्त्राचा अभ्यास करायला हे दोन प्राणी प्रतिरूप म्हणून वापरले जातात. बर्ड फ्ल्यू आला तेव्हा कोंबडीचे असंसर्गित भ्रूण मिळणे कठीण झाले. तेव्हापासून संशोधकांनी हायड्राला पसंती दिली. शिवाय हायड्राचा प्रयोगांसाठी वापर करण्यासाठी नीती समितीकडून परवानगी मिळवण्याचीही गरज नसते. त्यामुळे कालांतराने, आघारकर संशोधन संस्थेच्या प्राणी विभागाचे प्रमुख असलेले सुरेन्द्र घासकडबी ह्यांनी हायड्रा सांभाळण्याची जबाबदारी रोहिणीताईंवर सोपवली.
हायड्रांच्या शरीराची रचना अगदी साधी असते. त्यांना एक पाय असतो, दुहेरी भित्ती असलेले धड असते, त्याला एक मुख असते व मुखाला लागून लांब पातळ शुंडके असतात. हायड्राच्या शरीराच्या कुठल्याही तुटलेल्या तुकड्याची वाढ होऊन संपूर्ण हायड्रा तयार होऊ शकतो. फक्त त्या तुकड्यात हायड्राच्या शरीरातील प्रत्येक प्रकारच्या काही पेशी तरी असणे आवश्यक असते.
मुबलक अन्न उपलब्ध असताना हायड्रामध्ये अलैंगिक प्रजनन होते. धडावर छोटीशी कलिका येते, ती वाढते व धडापासून विलग होऊन नवीन हायड्रा तयार होतो. हायड्रा मध्ये लैंगिक प्रजननही दिसून येते. अंडाशय व वृषण तयार होतात, अंडी व पुं-युग्मक पाण्यात सोडली जातात व त्यांचा संयोग होऊन फलित अंडे तयार होते. अन्न पुरेसे असेल व पर्यावरणीय स्थिती पोषक असेल तेव्हा अंड्यातून नवीन हायड्रा बाहेर पडतो.

चित्र शीर्षक : हायड्राचे मुख व शुंडक चित्र सौजन्य: आरती हळबे
रोहिणीताई सध्या हायड्राचे दोन स्ट्रेन सांभाळतात. तलावातील फिकट भुऱ्या रंगाचे हे हायड्रा, हायड्रा व्हल्गॅरिस ह्या जातितील (स्पिशिस) आहेत. दोन्ही प्रकारचे हायड्रा सुरेंद्र घासकडबी यांनी गोळा केलेल्या नमुन्यांपासून वाढवले आहेत. एक नमुना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका तलावातून २००० साली गोळा केला आहे (आयएनडी-पुणे स्ट्रेन). दुसरा नमुना उत्तराखंड मधील नौकुचियाताल येथून २०१२ साली गोळा केला. (आयएनडी-एनके किंवा अती उंचीवरील हायड्रा स्ट्रेन).
एकाच जातितील असतील तरी हायड्राच्या वेगवेगळ्या स्ट्रेन मध्ये काही जनुकीय फरक असतात. हे स्ट्रेन संशोधनासाठी उपयोगात आणण्याच्या आधी, त्यांच्या जनुकीय आणि इतर गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांची नीट नोंद करावी लागते. रोहिणीताईंनी आयएनडी-एनके स्ट्रेन साठी हा अभ्यास केला. त्यांनी ह्या स्ट्रेनच्या उत्क्रांतीनिष्ठ मूळाचाही अभ्यास केला.
एकदा स्ट्रेनचे गुणधर्म स्पष्ट झाल्यावर, त्यात दुसरे कुठले स्ट्रेन मिसळत नाहीत ना ह्याची खात्री करणे हे रोहिणीताईंचे काम असते. हायड्रा ज्या परिस्थितीत राहतात ती परिस्थिती संपूर्णपणे ज्ञात असावी लागते, तरच हायड्रा संशोधन करण्यासाठी वापरता येतात. ते ज्या पाण्यात राहतात, त्यात काही ठराविक पदार्थ ठराविक प्रमाणात मिसळलेले असावे लागतात. हायड्राला बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका असतो, त्यामुळे ते ज्या पाण्यत (मिडियम किंवा माध्यम) राहतात ते पाणी सतत स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. हायड्राला काय खायला घालावे ह्याकडेही रोहिणीताईंना लक्ष द्यावे लागते.

चित्र शीर्षक : प्रयोगशाळेत हायड्रांची देखभाल करताना रोहिणी चित्र सौजन्य: रोहिणी लोंढे
“हायड्रा मेले किंवा स्ट्रेन हरवला तर जवळच्या तलावातून किंवा सरोवरातून नवीन हायड्रा सहज गोळा करता येतील. पण संशोधनासाठी हायड्रा हवे असतील तर संपूर्ण हायड्रा समूह एका हायड्रा पासून तयार झालेला असणे आवश्यक असते. तेवढे प्राणी निर्माण होऊन ते वाढायला वेळ लागतो. शिवाय त्यांचे भौतिक व रेण्वीय रचनेवर आधारित गुणधर्म ओळखून त्याची नोंद करायलाही वेळ लागतो. सर्वसाधारणपणे ह्या विश्लेषणाला तीन ते चार महिने लागतात, पण संस्थेतील माझ्या इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे काम करायला मला एक वर्ष लागू शकेल,” रोहिणीताई म्हणतात.
रोहिणीताईंना हायड्राबद्दल खूप काळजी आहे, शिवाय हायड्रा त्यांना अगदी भुरळ पाडतात. “कलिका तयार होते, तिची वाढ होते, आणि एक दिवस मुख्य हायड्रापासून ती विलग होते. हे सगळे बघणे अगदी रोमांचकारी असते. लैंगिक पुनरुत्पादन होते, तेव्हा सुरुवातीच्या अवस्था अगदी वेगाने म्हणजे ४८ तासात सुद्धा विकसित होत जातात. भ्रूणांच्या वाढीचे निरीक्षण करण्यासाठी मी कितीतरी वेळा अगदी पहाटे सुद्धा प्रयोगशाळेत आले आहे,” असे त्या सांगतात.
कोविड महामारीचे आव्हान

चित्र शीर्षक : हायड्रांची काळजी घेण्यासाठी घरी केलेली व्यावस्था चित्र सौजन्य: रोहिणी लोंढे
मार्च २०२० मध्ये अचानक संपूर्ण भारतात लॉकडाउन लागला. रोहिणीताईंसह काही मोजक्या लोकांना आघारकर संस्थेत प्राण्यांकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ जाण्याची परवानगी मिळाली होती. मात्र तरीही पोलीस व शासन लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार करत होते. त्यामुळे रोहिणीताईंना आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच संस्थेत जाता यायचे, ते सुद्धा अगदी थोड्या वेळाकरता. हायड्रांना खायला घालणे, खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे पाणी साफ करणे इत्यादी कामांसाठी किमान चार तास लागतात. इतका वेळ त्यांना संस्थेत थांबण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे हायड्रांची काळजी घेणे अशक्य झाले.
एप्रिलमध्ये रोहिणीताईंना कळून चुकले की हायड्रांना वाचवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे त्यांना घरी घेऊन जाणे. आणि त्यांनी तेच केले. हायड्रा घरी घेऊन जाणे म्हणजे संपूर्ण दिवस त्यांच्याजवळ राहण्यासाठीची, आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना जगवण्यासाठीची व त्यांना उत्तम स्थितीत ठेवण्यासाठीची बांधिलकी. हे सोपे नसणार होते, हे माहीत असूनही त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. उन्हाळा तीव्र होता, आणि हायड्रांना तर प्रयोगशाळेतील १८ ℃ (डिग्री सेल्सियस) तापमानाची सवय होती. “मग मी घरातला कूलर फुल्ल करून हायड्रासमोर ठेवायचे,” रोहिणीताई सांगतात.
मे २०२० मध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यावर, हायड्रांना परत एकदा प्रयोगशाळेतील स्थितीशी जुळवून घ्यावे लागले. केवळ रोहिणीताईंचे कौशल्य आणि अनुभव ह्यांच्या जोरावर महामारीमुळे झालेल्या स्थानांतरांमधूनही हायड्रा जिवंत राहू शकले. जुलै २०२१ मध्ये आम्ही रोहिणीताईंशी बोललो तेव्हा हायड्रा आता उत्तम स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजच्या कामकाजाचा पुन:प्रारंभ

चित्र शीर्षक : कोविड चाचणी करताना रोहिणी चित्र सौजन्य: रोहिणी लोंढे
महामारीची पहिली व दुसरीही लाट ओसरल्यावर आता रोहिणीताईंनी संस्थेतील आपल्या कामांचा परत ताबा घेतला आहे. हायड्रांची काळजी घेण्याव्यतिरिक्त त्या संशोधकांना कॉनफोकल मायक्रोस्कोप वापरण्यासही मदत करतात. पुणे व पुण्याच्या आसपासच्या शासकीय कोविड चाचणी केंद्रांसाठी कोविड चाचण्या करण्यास मदत करणाऱ्या आघारकर संशोधन संस्थेच्या गटाच्याही त्या सदस्य आहेत.
रोहिणीताईंना एआरआय मध्ये काही प्रशासकीय आणि काही संशोधनाशी संबंधित कामे असतात. एआरआय मधील सुरेंद्र घासकडबी ह्यांच्या जीवविकासशास्त्र प्रयोगशाळेत प्राण्यांचे भ्रूण विकसित होत असताना पेशींचे वर्तन व विकसनात जनुकांचे योगदान ह्यासंबंधी अभ्यास केला जातो. ह्या प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची देखरेख रोहिणीताई करतात. अनेकदा विद्यार्थ्यांना व संशोधकांना त्या अशी हाय-टेक उपकरणे वापरायला मदतही करतात.
भारतातील ज्या संशोधकांना हायड्राची गरज असेल त्यांना रोहिणीताईंच्या प्रयोगशाळेतून हायड्रा पुरवले जातात. २०१८ मध्ये त्यांनी एक हायड्रा संच विकसित केला. नाममात्र मूल्य देऊन उपलब्ध असणाऱ्या ह्या संचात हायड्रा चे नमुने, त्यांचे अन्न व त्यांना ठेवायला लागणारे विशिष्ट पाणी ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना हायड्राची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी त्या वेळोवेळी कार्यशाळाही आयोजित करतात.
रोहिणीताईंना एआरआय मध्ये काही प्रशासकीय आणि काही संशोधनाशी संबंधित कामे असतात. एआरआय मधील सुरेंद्र घासकडबी ह्यांच्या जीवविकासशास्त्र प्रयोगशाळेत प्राण्यांचे भ्रूण विकसित होत असताना पेशींचे वर्तन व विकसनात जनुकांचे योगदान ह्यासंबंधी अभ्यास केला जातो. ह्या प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची देखरेख रोहिणीताई करतात. अनेकदा विद्यार्थ्यांना व संशोधकांना त्या अशी हाय-टेक उपकरणे वापरायला मदतही करतात.
भारतातील ज्या संशोधकांना हायड्राची गरज असेल त्यांना रोहिणीताईंच्या प्रयोगशाळेतून हायड्रा पुरवले जातात. २०१८ मध्ये त्यांनी एक हायड्रा संच विकसित केला. नाममात्र मूल्य देऊन उपलब्ध असणाऱ्या ह्या संचात हायड्रा चे नमुने, त्यांचे अन्न व त्यांना ठेवायला लागणारे विशिष्ट पाणी ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना हायड्राची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी त्या वेळोवेळी कार्यशाळाही आयोजित करतात.
ही सर्व कामे रोहिणीताई कुठल्याही कायमस्वरूपी मदतनीसाशिवाय करतात. अधून मधून त्यांना रजेवर जावे लागल्यास विद्यार्थी मदत करतात, पण त्या जास्त वेळा रजा घेत नाही. हायड्रांची संख्या आहे तेवढीच ठेवायची असेल तर त्यांना दोन दिवसांतून एकदाच अन्न द्यावे लागते. जर संख्या वाढवायची असेल, तर मात्र रोज खायला घालावे लागते. “खूप दिवसांच्या सुट्टीवर मी क्वचितच जाते. हायड्रा साधारण एक आठवडा अन्नाशिवाय राहू शकतात हे मला माहित आहे, पण तरीही एकदा कुणीतरी सगळं ठीक आहे ना ते बघितले की मग मी निश्चिंत असते,” रोहिणीताई म्हणतात.
घरी असताना कुटंबियांबरोबर वेळ घालवायला रोहिणीताईंना आवडते. पण त्यांना सर्वात जास्त आवडते ते इंदापूरला शेतावर रहायला. “दोन दिवसांची जरी सुट्टी मिळाली तरी माझा नवरा आणि दोन मुलींबरोबर शेतावर जाऊन रहायची, आणि तिथे काही ना काही काम करायची संधी मी सोडत नाही,” त्या सांगतात. त्यांच्या मुलींना शैक्षणिक आणि शेती ही दोन्हीे क्षेत्रे माहिती व्हावीत असा प्रयत्न त्या करतात. निसर्गाशी नाते जोडून रहावे असे त्यांना वाटते.
मुलाखत झाल्यावर रोहिणीताईंनी मला हायड्रा बघायला नेले. “त्यांना खाताना बघायला पण खूप मजा येते,” त्या म्हणतात. मी शंभर टक्के सहमत आहे.
TheLifeofScience.com Season 6 is supported by contributors to our crowdfunding campaign, and also by a grant from the Thakur Family Foundation. Thakur Family Foundation has not exercised any editorial control over the contents of this reportage.